शेगाव येथील महिला मेळाव्याला उपस्थित माता- भगिनींशी संवाद साधला.
स्त्रिया आज कुठेच मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्यरत आहेत. स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, आर्थिक साक्षर व्हावे याकरिता राजर्षी शाहू परिवाराने नेहमीच पुढाकार घेतला आहे. बचतगटांच्या ३५ हजार महिलांना १५० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक महिला उद्योजक समोर आल्या याचे समाधान आहे.
वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपणास महिलांसाठी मोठे काम उभे करायचे आहे. महिलांना चांगल्या सुविधा मिळाव्या याकरिता प्रयत्न करायचे आहेत. जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे. जिजाऊंच्या नावाने बचतगटांच्या महिलांच्या उत्पादनासाठी एक ब्रँड असावा. मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ स्त्री शक्ती केंद्र. जिल्ह्यातील विधवा, निराधार, दिव्यांग, शेतमजूर महिलांची शासकीय नोंदणी अभियान राबविण्यात आले पाहिजे. महिला आरोग्य अभियान, युवती आवास योजना, बुलढाणा युवती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्पोर्ट्स फेस्टिवल, वार्षिक महिला भजनी मंडळ महोत्सव, बुलढाणा वुमेन सिंगिंग व डान्सिंग आयडॉलचे अशी स्पर्धा वर्षातून एकदा आयोजित केली पाहिजे. यामधून महिलांच्या कलागुणांचा विकास होईल आणि स्पर्धा जिंकण्याची उर्मी वाढेल.
महिलांमध्ये बचत, काटकसर, चिकाटी हे नैसगिक गुण आहेत. घेतलेल्या कर्जाची महिला नियमित परतफेड करतात. त्यांचा व्यवहार चोख असतो. महिलांनी आपल्यातील गुण ओळखावे. त्याचा योग्य वापर करुन प्रगती साधावी. वन बुलडाणा मिशन कायम आपल्या पाठीशी आहे.