जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या वन बुलढाणा मिशन या लोकचळवळीच्या माध्यमातून आपण जाहीरनामा जनतेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत जिल्हाभर संवाद मेळावे घेतो आहोत. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भरभरुन आशीर्वाद मिळतोय. काल बोरी आडगाव (ता.खामगाव) येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. या गावाने शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे. येणाऱ्या काळात परिवर्तनाच्या चळवळीत सुद्धा ही भूमी भरीव योगदान देईल, असा विश्वास आहे.
खामगावला आपण सिल्व्हर सिटी म्हणतो. वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड असे म्हटले जाते. देशातली एक नंबरची कापसाची ही बाजारपेठ होती. सुवर्णकाळ अनुभवलेला आपला जिल्हा आहे. हे वैभव आपणास परत मिळवायचे आहे. याकरिता सर्वांनी मिळून काम करुया. सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. जिल्ह्यात चांगल्या एमआयडीसी उभ्या राहिल्या पाहिजेत. युवकांच्या हाताला काम मिळायला हवे. बोरी आडगावचे भविष्यात बुट्टीबोरी का होऊ शकत नाही? नक्कीच होऊ शकते, याकरिता आपणास प्रयत्न करायचे आहेत.
नवरात्री उत्सव सुरु झाला आहे. माता जगदंबेचा उत्सव आहे. त्याकरिता आपण सर्वांना शुभेच्छा. विजयादशमी सण जवळ आला आहे. प्रभू श्रीराम यांनी रावणाचा संहार केला. चांगल्याने वाईटावर विजय मिळवल्याचा हा दिवस आहे. हा दिग्विजय उत्सव आपणास साजरा करायचा आहे.
येत्या २२ तारखेला म्हणजे अष्टमीला आपण बुलढाणा परिवर्तन पदयात्रा काढतोय. बुलढाणा येथील माता जगदंबेची आरती करून ही यात्रा सुरु होईल. तेथून चिखली येथील रेणुका मातेचे दर्शन घेऊ. या दोन शक्तीपीठांना आपण साकडे घालणार आहोत. आपणास जिल्ह्याच्या मागासलेपणाचे सीमोल्लंघन करायचे आहे. यादिवशी तसा संकल्प घेऊया. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती.