जिजाऊ ज्ञानमंदिर & ज्युनिअर क्रॉप सायन्स कॉलेज(पळसखेड भट)मध्ये आयोजित आनंद मेळावा आणि विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन केले. राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा ही स्कूल संचालित आहे. 

आनंद मेळाव्यात जवळपास ७५ स्टॉल लावण्यात आले होते. विविध खाद्यप्रकारांची विक्री करुन विद्यार्थ्यांनी ३६ हजार ८५० रुपयांची कमाई केली. यावरुन त्यांची आर्थिक साक्षरता अधोरेखित झाली. विज्ञान प्रदर्शनात १८० विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. सर्वच प्रकल्प कौतुकास्पद होते. समर्थ मदन देशमाने या विद्यार्थ्याने 'हायपर लूप' ट्रेनची प्रतिकृती सादर केली. एलन मस्क यांची ही संकल्पना आहे. जगभरात हळूहळू या तंत्रज्ञानावर काम सुरु आहे. आपल्या देशातही हायपर लूप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लवकरच वेगवान प्रवास शक्य होणार आहे.

हायपर लूप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवेच्या पोकळीतून स्पीडब्रेकरशिवाय मेट्रोसारख्या ट्रेनमधून प्रवास करणे शक्य होते. त्यासाठी विशिष्ट आकार आणि स्वरुपाच्या ट्युबची निर्मिती केली जाते. त्यातील ट्रेनचे डबे कॅप्सूलसारखे असतात. चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या रुळांवरून ही ट्रेन धावते. बुलेट ट्रेनपेक्षा दुप्पट वेगाने ही ट्यूब ट्रेन धावते. तिचा वेग ८०० ते १२०० किलोमीटर प्रतितास आहे. कॅप्सूलसारख्या या डब्यातून एकावेळी ८ ते ९ प्रवासी प्रवास करतात.

समर्थने सादर केलेली हायपर लूप प्रकल्पाची कल्पना भन्नाट आहे. विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा आणि पोषक वातावरण दिल्यास त्यांच्यातील टॅलेंट नक्कीच खुलते, याची प्रचिती आली. विद्यार्थ्यांचे व्यावहारिक कौशल्य आणि विज्ञानाबद्दलची जिज्ञासा बघून भारावलो. बाल वैज्ञानिकांचे अभिनंदन...!

Related Posts